Ad will apear here
Next
पुस्तकं आणि पुस्तकवेडा विनायक!
फोटो : प्रसाद पवार (रिसर्च आर्टस् वर्क्स)

पुस्तकं वाचण्यासाठी विकत घ्यावी लागतात, तर कधी वाचनालयाचं सभासद व्हावं लागतं; मात्र नाशिकच्या विनायक रानडे नावाच्या पुस्तकवेड्या माणसानं या पुस्तकांना चक्क आपल्या दारात आणून ठेवलं आहे. ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या सदरात आज पाहू या पुस्तकांना आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनवू पाहणाऱ्या विनायकची हृदयाला भिडणारी, प्रेरणा देणारी गोष्ट...
...........
पुस्तकवेड्या विनायकबद्दल बोलण्याआधी पुस्तकांवर बोलावं असं मनात आलं. खरं तर पुस्तकाशिवाय जगणं ही कल्पनाही सहन होत नाही. पुस्तकं आपल्या आयुष्यात पावलोपावली साथ देत राहतात. 

असं म्हणतात अकबराचा दरबार अत्यंत बुद्धिमान कलाकार आणि साहित्यिक अशा नवरत्नांनी सजलेला होता. त्यामुळे त्याच्या दरबारात संगीत, चित्र-शिल्प, नृत्य, साहित्य, तत्व्गज्ञान अशा अनेक विषयांवरच्या वाद-चर्चा नेहमीच घडत. त्या ऐकून लोक समृद्ध होत. हिरे, माणिक, पाचू अशा नवरत्नांपेक्षाही अनमोल रत्न कुठलं असेल, तर ते म्हणजे पुस्तक, असं महात्मा गांधींनी म्हणून ठेवलंय ते उगाच नाही. मार्क ट्वेन यानं आदर्श जीवनाविषयी खूपच सुंदर विचार सांगितलाय. तो म्हणतो, ‘चांगले मित्र आणि चांगली पुस्तकं ज्याच्या जवळ असतील, त्याचं जगणं आदर्श असतं.’

हिंदीमध्ये ‘किताबे’ नावाची गुलजार यांची कविता, तर मराठीमध्ये सफदर हाश्मी, सतीश काळसेकर आणि किशोर पाठक, पृथ्वीराज तौर यांच्या पुस्तक या विषयावरच्या कवितांनी आपल्याला समृद्ध केलं आहे. पुस्तकांमुळे माणसाचं जगणं अर्थपूर्ण तर झालंच; पण त्याचबरोबर मानवी संस्कृती, इतिहास आणि ज्ञान यांची जोपासना ग्रंथांनी केली. पुस्तकांनी माणसांमधल्या माणुसकीला सतत जागं ठेवण्याचं काम केलंय.

मराठी आणि हिंदी भाषेशिवाय पंजाबी, बंगाली, नेपाळी भाषेतही पुस्तकांवर खूप चांगल्या कविता आहेत. मनोहर बंदोपाध्याय हा कवी म्हणतो, ‘पुस्तकांबरोबर आपल्याअनेक जुन्या आठवणी असतात, अनेक हळुवार नाती असतात. एखादं पुस्तक उघडलं जातं, तेव्हा त्या त्या दिवसांच्या आठवणी ताज्या होतात.’ 

नेपाळी कवी जीवन नामदुंग आपल्या कवितेतून एक अनामिक भीती व्यक्त करतात. ते म्हणतात... 

पुस्तक जाळणाऱ्यांची 
खूप भीती वाटते मला
पुस्तकाच्या नावाखाली ते
आपला इतिहास जाळत असतात
आपली माती आणि आपलं सत्य जाळत असतात
पुस्तक जाळणाऱ्यांबद्दल मला काळजी वाटते
पुस्तकाच्या नावाखाली 
ते एक देश जाळत असतात
सभ्यतेचे संस्कृतीचे शिल्लक अवशेष जाळत असतात

ही कविता वाचल्यानंतर, नालंदा, तक्षशीला अशा ठिकाणांमधली विद्यापीठं जाळली गेली आणि त्यात कितीक ग्रंथसंपदा नष्ट झाली हे आठवून मनाला खिन्नता आली. पुस्तकं म्हणजे थोर व्यक्तींना जतन करून ठेवण्यासारखंच तर आहे. हीच पुस्तकं आई, वडील, आजोबा, बहीण, भाऊ, मुलगी, मैत्रीण बनून आयुष्यात येतात. त्यावर हिंदीतून लिहिणारे कवी शैलेंद्रकुमार त्रिपाठी म्हणतात... 

एका परिपूर्ण जाणिवेचं नाव आहे पुस्तक
एका सुखी संपन्न परिवाराचं नाव आहे पुस्तक
कुटुंबाच्या सुरक्षेसाठी
ध्येयाच्या जपणुकीसाठी
मानवाच्या संरक्षणासाठी
खूपच गरजेची आहे
पुस्तकांची जोपासना
खूपच गरजेची.

पंजाबी कवी सुतिंदरसिंह यांना तर प्रेम करणं आणि पुस्तक वाचणं एकसारखंच वाटतं. रात्रंदिवस साथ देणाऱ्या जिवलगाप्रमाणे त्यांना पुस्तकं वाटतात. ही पुस्तकं आपल्या घराच्या कपाटांमध्ये दिमाखात सजूनधजून बसलेली असतात, तर वाचनालयांमध्ये त्यांना बघून वैविध्याने नटलेल्या रंगीबेरंगी जत्रेची आठवण होते. 

पुस्तकं वाचण्यासाठी विकत घ्यावी लागतात, तर कधी वाचनालयाचं सभासद व्हावं लागतं; मात्र नाशिकच्या विनायक नावाच्या पुस्तकवेड्या माणसानं या पुस्तकांना चक्क आपल्या दारात आणून ठेवलं आहे. पुस्तकांना आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनवू पाहणाऱ्या विनायकची गोष्ट हृदयाला भिडणारी, प्रेरणा देणारी.....!

नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा ‘ग्रंथ तुमच्या दारी’ हा उपक्रम देशातच नव्हे, तर देशाबाहेर पोहोचवणारा विनायक माझा १०-१२ वर्षांपासूनचा मित्र! स्वभावानं फटाकडा.... अनेकदा त्याचा रागच यायचा. यानं थोडं मवाळ व्हावं असं वाटायचं; पण त्या वेळी मी खूप भिडस्त असल्यानं त्याला ते कधी सांगितलं नाही आणि त्यानं ते तेव्हा ऐकलंही नसतं. 

लेखिका दीपा देशमुख यांच्यासह विनायक रानडेदिवस जात होते, वर्षं उलटत होती. अधूनमधून नाशिकला गेले, की विश्वास ठाकूर (संचालक, विश्वास सहकारी बँक, नाशिक) या माझ्या मित्राबरोबर विनायकची भेट होत होती. नंतर आम्ही प्रत्येक जण आपापल्या व्यापात गुंतलो होतो आणि अचानक आठ-नऊ वर्षांपूर्वी एक घटना घडली आणि तिच्यामुळे विनायकचं सगळं आयुष्य बदलून गेलं. त्या घटनेनंतरचा विनायक आणि आधीचा विनायक यात जमीनअस्मानाचा फरक होता. आताचा विनायक मनमिळाऊ, मऊ-मृदू स्वभावाचा, इतरांची काळजी घेणारा, विनोदी, हजरजबाबी असा होता. विनायकचं हे रूप मला खूपच अनोखं होतं. या बदलामागची कहाणी तितकीच विलक्षण होती. 

विनायक प्रवासात असताना त्याचा फार मोठा अपघात झाला आणि त्याचा ड्रायव्हर जागच्या जागीच ठार झाला. विनायकला गंभीर अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. दीड-दोन वर्षं विनायक हॉस्पिटलच्या बेडवर पडून होता. सगळ्या अंगाची चाळणी झालेली.... अनेक ठिकाणी रॉड बसवलेले... जगेल की नाही माहीत नाही अशी परिस्थिती.... हतबलता काय असते हे तो त्या सगळ्या दिवसांत अनुभवत होता. आपण आपलीच बायको आणि मुलांवर कशा प्रकारे दादागिरी करत वागत होतो हे चित्र त्याला दिसत होतं. आयुष्य किती क्षणभंगुर आहे हे कळत होतं; पण आता आपण बदलू ही संधीदेखील मिळणार की नाही हे ठाऊक नव्हतं. आपल्यामुळे दुखावलेले अनेक चेहरे डोळ्यांसमोरून सरकत होते.... डोळ्यांतून पश्चा तापाचे अश्रू वाहत होते, मनाच्या वेदना वेगळ्याच होत्या; पण त्याचबरोबरच शरीराच्या यातना सहन करण्यापलीकडच्या होत्या. 

...मात्र त्या सगळ्या जीवघेण्या कालावधीनंतर चमत्कार घडला असं म्हणू या. खरं तर डॉक्टरांचे अथक प्रयत्न, विनायकची तीव्र इच्छाशक्ती या सगळ्यांचा परिणाम होऊन विनायक या अपघातातून पूर्ण बरा झाला. आपलं यापुढचं आयुष्य म्हणजे आपल्याला नव्यानं मिळालेली भेट आहे, काहीतरी चांगलं करण्याची संधी आहे असं त्याला वाटलं आणि मग काय विनायकनं मनाशी पक्का निग्रह केला आणि त्याप्रमाणे पावलं उचलली. 

विनायकचा स्वतःचा व्यवसाय उत्तम सुरू होताच. त्यातून त्यानं आपल्या कुटुंबाला आर्थिक त्रास सहन करावा लागणार नाही याची तरतूद केली आणि नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा विश्व्स्त असल्यानं ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात पुढाकार घेतला. वाचनानं माणूस समृद्ध होतो, बदलतो, घडतो आणि हे कामच आपण आता आयुष्यभर निःस्वार्थ भावनेनं करायचा त्याचा निर्धार होता. 

अनेक उत्तमोत्तम पुस्तकांची एक पेटी त्यानं तयार केली. ही पुस्तकांची पेटी एखाद्या सोसायटीतल्या एका व्यक्तीच्या हाती सुपूर्द करायची आणि त्या व्यक्तीनं इतरांना सदस्य करून पेटीतल्या पुस्तकांना वाचक मिळवून द्यायचा. अशा प्रकारे वाचनसंस्कृती वाढणार होती. वाचून झालेल्या पुस्तकांची पेटी काही ठरावीक कालावधीनंतर बदलून मिळणार होती. एका पेटीपासून नाशिकला सुरुवात केलेल्या विनायकनं अल्पावधीत संपूर्ण महाराष्ट्र काबीज केला. महाराष्ट्रच नव्हे, तर देश-विदेश (युरोप, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, दुबई....) पादाक्रांत करत विनायक पुस्तकांना संपूर्ण जगभर पोहोचवत राहिला. आज १५०० पेट्या आणि पावणेदोन कोटींची ग्रंथसंपदा विनायकच्या उपक्रमाचा भाग आहे. या त्याच्या कामाचा झपाटा पाहून साहाय्य करण्यासाठी अनेकांचे हात पुढे आले. अनेक बँकांनी पुस्तकांच्या प्रत्येक ठिकाणच्या पेटीची अदलाबदल करण्यासाठीची वाहतूक व्यवस्था करण्यासाठी मदत केली आणि आजही करताहेत. याचं कारण ‘एटीएम’मधल्या कॅशची व्यवस्था करण्यासाठी त्यांची गाडी जात असल्यामुळे हेही चांगलं काम आपण करू या, असं त्यांनी ठरवलं. पुस्तकं विकत घेऊन देण्यासाठी अनेक देणगीदार पुढे आले. त्यांनी सढळ हातानं रोख रक्कम विनायककडे सुपूर्द केली. लेखक/कलाकार मंडळीही या उपक्रमाचा हिस्सा बनत गेली. विनायकच्या या उपक्रमात ठिकठिकाणी पुस्तक पेटीच्या वितरणाबरोबर या साहित्यिक मंडळींच्या गप्पा वाचकांबरोबर रंगू लागल्या. 

या सगळ्यांतून विनायकनं मुलांसाठीचा वेगळा उपक्रम सुरू केला. यात फक्त मुलांसाठीची मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषेतली पुस्तकं त्यानं सहभागी केली. या उपक्रमालाही उत्तम प्रतिसाद मिळाला. शांत बसेल तो विनायक कसला? एके दिवशी त्याच्या असं लक्षात आलं, की लोक पुस्तक विकत घेतात, त्यांची पुस्तकं वाचून होतात आणि मग ती घरात धूळ खात पडून राहतात. ही पुस्तकं ना कोणाला भेट म्हणून देता येतात, ना घरात ठेवता येतात. मग रद्दीच्या भावात ती घरातून काढली जातात. काही लोकांना जागेच्या अडचणीमुळे इच्छा असूनही ती संग्रही ठेवता येत नाहीत. अनेकांना ती नीटपणे सांभाळणं, त्यांची निगा राखणं वृद्धावस्थेमुळे जमत नाही. या सगळ्यांचं काय करावं हा विचार करताना विनायकला एक अभिनव कल्पना सुचली आणि त्यानं ती लगेच अंमलात आणली. 

‘मोफत पुस्तक घ्या आणि तुमच्याकडलं एक पुस्तक त्या बदल्यात द्या’ अशी ती योजना आहे. यात माझं पुस्तक किती किमतीचं आणि मिळणारं पुस्तक त्याच किमतीचं हवं असा काही नियम विनायकनं ठेवला नाही. या आणि एक-दोन-वीस कितीही पुस्तकं द्या आणि त्या बदल्यात तितकीच आवडतील ती पुस्तकं निवडून घेऊन जा, असा साधा-सोपा एकच निकष त्यानं ठेवला. बोरिवली, ठाणे, मुंबई, कोकण, पुणे अशा अनेक ठिकाणी हा उपक्रम सुरू झाला. लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. काही लोकांनी तर आपली सुस्थितीतली २००-२५० पुस्तकं विनायकला विनामोबदला, कुठल्याही अपेक्षेशिवाय देऊन टाकली. 

विनायकचं वैशिष्ट्य म्हणजे हे काम तो कुसुमाग्रज प्रतिष्ठानकडून कुठलंही मानधन न घेता अव्याहतपणे करतो आहे. प्रत्येक ठिकाणी पेट्या उचलून फिरणं, स्वतः जातीनं उभं राहून कष्ट करणं, हसतमुखानं वाचकांबरोबर संवाद साधणं हे काम तो करतो आहे. इतकं अर्थपूर्ण आयुष्य जगणाऱ्या माझ्या या मित्राला - विनायकला, त्याच्या प्रयत्नांना, त्याच्या जिद्दीला आणि त्याच्या यशाला खरोखरच सलाम!

संपर्क : विनायक रानडे
ई-मेल : vinran007@gmail.com 
मोबाइल : ९९२२२ २५७७७, व्हॉट्सअॅप : ९४२३९ ७२३९४

- दीपा देशमुख
मोबाइल : ९५४५५ ५५५४०
ई-मेल : deepadeshmukh7@gmail.com

(दीपा देशमुख या प्रसिद्ध लेखिका असून, त्या वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात.)

(‘अनवट वाटेवरचे वाटसरू’  हे सदर दर पंधरा दिवसांनी गुरुवारी प्रसिद्ध होते.)

(दोन खासगी वृत्तवाहिन्यांवरील विनायक रानडे यांच्या मुलाखती पाहण्यासाठी येथे किंवा येथे क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZWCBH
 Mam.khupach sundar.Apalya ya sadaramule navi manase...nave jag..kalate.samrudhda hota yete.1
 एक अतिशय स्यूत्य उपक्रम केलाय विनायकाने. त्याचे मनापासून अभिनंदन आणि हा उपक्रम आमच्यासमोर आणल्या बददल आपलेही अभिनंदन1
Similar Posts
बालसाहित्य मोफत उपलब्ध नाशिक : येथील ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’तर्फे लहान मुलांना घरी वाचनासाठी ‘बालसाहित्य’ मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. टिळकवाडी येथील के. ज. म्हात्रे वाचनालय आणि गंगापूर रोड येथील कुसुमाग्रज स्मारक वाचनालय, येथे इयत्ता आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी बालसाहित्य उपलब्ध आहेत. तसेच ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’मधील
पुस्तक रथ जाणार भिलारला भिलार (पुणे) : कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे तीन मे रोजी सकाळी अकरा वाजता पुण्यातील ‘माझं ग्रंथालय’ येथे नव्या ग्रंथपेटीचे वितरण करण्यात आले. चार मे रोजी राज्याचे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून साकारणाऱ्या पाचगणीजवळच्या भिलार या मराठी पुस्तकांच्या गावाचा शुभारंभ होत आहे. तेथे ‘ग्रंथ तुमच्या दारी’च्या ‘पुस्तक रथा’चे आगमन होणार आहे
ग्रंथ निघाले ठाण्याला ठाणे : कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे सहा आणि सात मे रोजी ठाण्यातील ‘घंटाळी सहनिवास’ येथे नव्या ग्रंथपेटीचे वितरण करण्यात येणार आहे. सहा मे रोजी, सायंकाळी पाच ते रात्री आठपर्यंत, तसेच सात मे रोजी सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या उपक्रमाची विक्रमी घोडदौड चालू आहे
बालग्रंथालयातर्फे बोधकथावाचन नाशिक : येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या बालग्रंथालयातर्फे लहान मुलांसाठी ‘बालज्ञानी एज्युकेटर’ यांच्या सहकार्याने बोधकथावाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आज ३० मे रोजी सायंकाळी पाच ते सात वाजेपर्यंत गंगापूर रोड येथील कुसुमाग्रज स्मारक वाचनालयात स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिवीरांच्या गोष्टी सांगण्यात येणार आहेत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language